“निरा-वागजचा अभिमान, बारामतीची शान, तरुणाईचं प्रेरणास्थान: विश्वासराव देवकाते तथा नाना पाटील”

निरा-वागजचा अभिमान, बारामतीची शान, तरुणाईचं प्रेरणास्थान: विश्वासराव देवकाते तथा नाना पाटील”
   
Zee महाराष्ट्र न्यूज . (महेश गडदे.)

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जनतेच्या मनात घर करून राहिलेले आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान विश्वासराव देवकाते (नाना पाटील) यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका व्यक्तीचा जन्मदिन नव्हे; तो ग्रामीण विकासाच्या सातत्यपूर्ण प्रवासाचा स्मरणदिन आहे. नेतृत्व हे केवळ पदावरून मोजले जात नाही. ते लोकांच्या विश्वासातून आणि कृतीतील सातत्यातून सिद्ध होते.याचा प्रत्यय नानांच्या आजवरच्या वाटचालीतून वारंवार येतो.
       
बारामती तालुक्यातील निरा-वागज या मातीतून घडलेले नाना पाटील हे त्या भूमीचे संस्कार, कष्ट आणि जिद्दीचे प्रतीक आहेत. शेतकऱ्यांच्या आशा, शेतमजुरांच्या संघर्ष आणि ग्रामीण समाजाच्या स्वप्नांना त्यांनी आपल्या कार्यातून दिशा दिली. म्हणूनच “निरा वागज हे गाव नानाचे गाव” ही भावना घोषवाक्यापुरती मर्यादित राहत नाही तर ती लोकांच्या मनातील श्रद्धा ठरते.
       
लोकनेते अजित पवार (अजितदादा) यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून नानांची ओळख निर्माण झाली. “नावातच ‘विश्वास’ आणि कार्यातही तितकाच विश्वास” या समन्वयातून त्यांनी विकासाभिमुख राजकारणाला स्थानिक पातळीवर बळ दिले. प्रशासन आणि जनतेमधील दरी कमी करत त्यांनी संवाद आणि समन्वयाचा भक्कम पूल उभारला.
      
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण पायाभूत सुविधांना चालना दिली; मात्र त्यांची कार्यमर्यादा तेवढ्यावरच थांबली नाही. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे PDCC बँकेचे सदस्य म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रातही सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावली. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकारी बँकिंग व्यवस्थेत पारदर्शकता, शिस्त आणि शेतकरीहित जपण्यावर त्यांनी भर दिला.
शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, लघुउद्योजकांना आर्थिक बळ, महिला बचतगटांना प्रोत्साहन आणि सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बँकेच्या धोरणांमध्ये ग्रामीण विकासाचा दृष्टिकोन कायम ठेवत, आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हता यांचा समतोल राखण्याचे काम त्यांनी केले. सहकार क्षेत्रात काम करताना त्यांनी ‘विश्वास’ या मूल्याला केंद्रस्थानी ठेवले कारण आर्थिक व्यवहारात विश्वास हरवला तर विकासाची गती खुंटते, याची त्यांना जाणीव होती.
      
आजच्या तरुणाईसाठी नाना पाटील हे प्रेरणास्थान आहेत. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यांचा संगम त्यांच्या नेतृत्वात दिसतो. पद मोठं असलं तरी मन अधिक मोठं ही त्यांची खरी ओळख. कार्यकर्त्यांशी जिव्हाळा आणि जनतेशी थेट संवाद यामुळे ते ‘नेत्या’पेक्षा ‘मार्गदर्शक’ म्हणून अधिक मानले जातात. बारामती मध्ये अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समाज आणि लोकाभिमुख कार्य करण्यावरती ते सातत्याने प्रयत्न करत आहेत.
       
यावर्षी मात्र वाढदिवस एका वेगळ्याच भावनेने उजाडला आहे. लोकनेते अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण बारामतीत शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नाना पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच बारामती पंचक्रोशीत असणाऱ्या सर्व गावच्या जत्रा यात्रा, सण उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सर्व नागरिकांसमवेत नानांनी घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या संवेदनशीलतेचा आणि नात्यांप्रती असलेल्या निष्ठेचा प्रत्यय देणारा आहे. उत्सवापेक्षा मूल्यांना आणि नात्यांना दिलेला हा मान त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक उंची देतो.

आज उत्सव नाही; पण आदर आहे. जल्लोष नाही; पण विश्वास आहे. नाना पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. “त्यांचा विकासाचा संकल्प अधिक दृढ होवो, सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य अधिक व्यापक होवो,
आणि निरा-वागजच्या मातीतून उगवलेला हा दीप समाजसेवेच्या आकाशात अधिक तेजाने प्रज्वलित राहो.” हिच परमेश्वर चरणी सदिच्छा.

डॉ. प्रकाश पांढरमिसे
 ( रुई बाबीर, इंदापूर)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला माणूस" जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात.

इंदापूर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात-भाजपा नेते तानाजी मारकड.

श्री बाबिर् विद्यालय रुई येथे २३ वर्षांनी माजी विद्यार्थी व् शिक्षक स्नेह मेळावा