अजितदादांकडून सहकार चळवळीला मोठी मदत-हर्षवर्धन पाटील.
___________________________
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे निरा भिमा कारखान्यावरती श्रद्धांजली सभेत बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
•नीरा भीमा कारखान्यावरती श्रद्धांजली सभा
इंदापूर.दि.०२: राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, अशी अजितदादांची भूमिका होती. त्याचबरोबर अजितदादांनी राज्य सरकारच्या माध्यमातून सहकार चळवळीला कायम सहकार्य केले. त्यामुळे अजितदादांच्या जाण्यामुळे सहकार चळवळीचे नुकसान झाल्याचे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि. 2) व्यक्त केले.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहणेसाठी आयोजित शोकसभेत हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले,अजितदादा यांना राज्यातील सर्वच विषयांचा अभ्यास होता. त्यांनी राज्यातील कृषी-प्रक्रिया उद्योगाच्या बळकटीकरणासाठी सातत्याने काम केले. साखर उद्योगाला सहकार्य करण्याची त्यांची सातत्याने भूमिका होती. समाजातील सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी अजितदादांनी आपले आयुष्य वेचले.
अजितदादा व आंम्ही राज्य मंत्रीमंडळात सुमारे 20 वर्षे बरोबर काम केले. आमचे राजकीय मतभेद त्याकाळी होते, मात्र वैयक्तिक मैत्री कायम होती. आता अलीकडच्या काळात संघर्ष नको, आपण एकत्र काम करू, अशी अजितदादांनी भूमिका घेतली होती. त्यानुसार आम्ही एकत्र येत काम करण्यास सुरुवात केली, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
अजितदादांच्या अचानकपणे निघून जाण्याने राज्याचे अपरिमित असे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. आता सुनेत्रावहिनी यांनी दुःख बाजूला ठेवून, राज्याच्या हितासाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. दुखत प्रसंगी सर्वांनी पवार कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
याप्रसंगी लालासाहेब पवार, अंकिता पाटील ठाकरे, अँड.कृष्णाजी यादव, उमेश पाटील, के. एस. खाडे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी श्रद्धांजली वाहणारी मनोगते व्यक्त केली. यावेळी कारखान्याचे अध्यक्षा भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ आदींसह अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा