पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे प्रेरणादायी कार्य – डॉ. प्रकाश पांढरमिसे.
“न्याय, नीतिमत्ता आणि लोककल्याणाचा आदर्श राजधर्म” : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे प्रेरणादायी कार्य – डॉ. प्रकाश पांढरमिसे.
Zee महाराष्ट्र न्यूज.(महेश गडदे)
इंदापूर.ता.०३: राजसत्ता ही वैभवासाठी नव्हे, तर प्रजेच्या कल्याणासाठी असते, हे तत्त्व प्रत्यक्षात उतरवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य भारतीय इतिहासातील एक तेजस्वी पर्व असल्याचे प्रतिपादन टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय (स्वायत्त) खडकी येथील इतिहास विभागप्रमुख, ऐतिहासिक व सामाजिक अभ्यासक, व्याख्याते डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी केले. औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध – पुणे येथे राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना उपप्रचार्य डॉ. संदीप ननावरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात आढावा घेतला. “इतिहासातील स्त्री सत्ताधीश म्हणून अहिल्यादेवी होळकर या केवळ प्रशासक नव्हत्या, तर त्या मूल्याधिष्ठित समाजरचनेच्या शिल्पकार होत्या. त्यांच्या कार्याचा अभ्यास आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
प्रमुख व्याख्याते डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासनातील न्यायप्रियता, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यांचा सविस्तर आढावा घेतला. मंदिर पुनर्बांधणी, तीर्थक्षेत्रांचे संवर्धन, धर्मशाळा, घाट, पाणवठे व रस्त्यांची उभारणी या माध्यमातून त्यांनी केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचे कार्य केले, असे त्यांनी सांगितले. “अहिल्यादेवींचे राज्य म्हणजे कल्याणकारी राजसत्तेचे उत्तम उदाहरण आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली कार्य या हेच सीमापार होते याला सीमेची मर्यादा होते ना भाषेची मर्यादा होते ना पंथाचे मर्यादा वतीने प्रांताची मर्यादा होती ना धर्माची मर्यादा होती. त्यांचे कार्य मानवतावादी व लोककल्याणकारी कार्य धर्मनिरपेक्ष, सर्वधर्मसमभाव, सहिष्णूता यांना प्राधान्य देणारे होते. त्यांचे कार्य आजच्या राज्यकर्त्यांना आदर्शदायी व अनुकरणीय आहे असे म्हटले..
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. “अहिल्यादेवी होळकर यांचा कारभार हा लोकशाही मूल्यांची पूर्वतयारी मानता येईल. स्त्री असूनही त्यांनी त्या काळातील सामाजिक बंधनांवर मात करून आदर्श प्रशासन उभे केले,” असे त्यांनी सांगितले. आजच्या प्रशासकांनी व राजकीय नेतृत्वाने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात इतिहास विभाग प्रमुख मा. डॉ. प्रकाश पांढरमिसे, प्राध्यापक, विद्यार्थी व इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डॉ. बाबासाहेब कलापुरे यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. वैशाली सुपेकर यांनी केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तृत्व हे केवळ इतिहासातील गौरवगाथा नसून आजच्या समाजव्यवस्थेसाठी मूल्यनिष्ठ मार्गदर्शन ठरते, हा संदेश या कार्यक्रमातून ठळकपणे विध्यार्थ्यांसमोर आला.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा