प्रा.डॉ.संजय चाकणे,भारतीय उच्च शिक्षणाला दिशा देणारे दिशादर्शक प्रशासक -डॉ.प्रकाश पांढरमिसे

प्रा. डॉ. संजय चाकणे भारतीय उच्च शिक्षणाला दिशा देणारे दिशादर्शक प्रशासक - डॉ.प्रकाश पांढरमिसे.

Zee  महाराष्ट्र न्यूज..( श्री.महेश गडदे. )
          
इंदापूर.ता.०१: भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेला आज जेव्हा गुणवत्तेची, नवोन्मेषाची आणि मूल्याधिष्ठित नेतृत्वाची नितांत गरज आहे, तेव्हा काही व्यक्तिमत्त्वे केवळ प्रशासक म्हणून नव्हे, तर दिशादर्शक दीपस्तंभ म्हणून समोर येतात. त्यापैकी प्राचार्य डॉ. संजय चाकणे हे असेच एक नाव आहे, ज्यांनी गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात भरीव स्वरूपाचे कार्य करताना अध्यापन, संशोधन, प्रशासन आणि समाजभान यांचा समन्वय साधत उच्च शिक्षणाला नवी दिशा दिली आहे.
             
डॉ. संजय चाकणे यांनी ग्रामीण पार्श्वभूमीतून येत शहरी शैक्षणिक विश्वात स्वतःची ठाम ओळख निर्माण केली आहे त्यांचा शैक्षणिक प्रवास प्रेरणादायी प्रेरणा देणारा आहे. गेली ३५ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या या अभ्यासू नेतृत्वाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तब्बल सात वर्षे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) संचालक म्हणून काम करत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजवली. स्वयंसेवेच्या माध्यमातून शिक्षण समाजाशी जोडले गेले पाहिजे, ही त्यांची ठाम भूमिका त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून येते.

प्राचार्य म्हणून त्यांनी गेली सतरा वर्षे विविध महाविद्यालयांत नेतृत्व करताना केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, तर संस्थात्मक परिवर्तनाचा ध्यास घेतला. विशेषतः इंदापूर येथे बारा वर्षांच्या कालावधीत त्यांनी इंदापूरच्या आय कॉलेजला शैक्षणिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय क्षेत्रात अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिले. हे यश व्यक्तिकेंद्री न राहता संघभावनेतून साध्य झाले, याचे श्रेय त्यांच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याच्या नेतृत्वगुणाला आणि संघठन कौशल्याला जाते.
              
डॉ. संजय चाकणे यांचे संशोधनच्या क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक संशोधन निबंध, २३ पुस्तके आणि तब्बल २२ पेटंट्स त्यांच्या नावावर नोंदलेली आहेत. संशोधन हे केवळ पदवी मिळविण्यापुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी आणि उद्योगाभिमुख असावे, ही त्यांची भूमिका त्यांनी कृतीतून सिद्ध केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्राप्त केली असून संशोधक घडविण्याची परंपरा त्यांनी जोपासली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीतही डॉ. चाकणे अग्रेसर राहिले आहेत. बहुविषयक शिक्षण, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम, संशोधन व नवोन्मेष यांचा समावेश करत त्यांनी धोरणाची अंमलबजावणी केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष शिक्षणप्रक्रियेत उतरवली. याच दृष्टिकोनातून खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाला त्यांनी नॅकची ‘A’ ग्रेड व स्वायत्त (Autonomous) दर्जा मिळवून दिला. हा दर्जा म्हणजे संस्थेच्या गुणवत्तेची आणि विश्वासार्हतेची पावतीच होय.

उत्तम वक्तृत्व, प्रभावी सूत्रसंचालन, कुशल प्रशासन आणि सृजनशीलतेचा ध्यास ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रत्यक्षात आणत त्यांनी अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन, विविध समित्यांवरील कार्य, तसेच देश-विदेशातील शैक्षणिक अनुभव यांमुळे त्यांची दृष्टी व्यापक बनली आहे. आतापर्यंत ३२ देशांना दिलेल्या भेटी आणि भारतातील ३०२ गड-किल्ल्यांवरील भटकंती ही त्यांच्या जिज्ञासू, अभ्यासू आणि सांस्कृतिक जाणीव असलेल्या दिशादर्शक व कुशल व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतात.
          
राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेले पारितोषिक हे त्यांच्या कार्याची अधिकृतपणे घेतलेली दखल आहे. विद्यापीठ, महाविद्यालय, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध समित्यांवर त्यांनी केलेले काम भारतीय उच्च शिक्षण धोरणनिर्मितीत मोलाचे ठरले आहे.
         
अशा या बहुआयामी शैक्षणिक नेतृत्वाचा गौरव म्हणून विश्वभारती प्रतिष्ठानतर्फे त्यांना नुकताच ‘विश्वभारती पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी पुण्यात होणाऱ्या समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून, हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून भारतीय उच्च शिक्षणातील मूल्यनिष्ठ, संशोधनाभिमुख आणि समाजाभिमुख नेतृत्वाचा तो सार्थ गौरव आहे.प्राचार्य डॉ. संजय चाकणे हे आजच्या काळातील असे प्रशासक आहेत, जे शिक्षणाला व्यवसाय न मानता परिवर्तनाचे साधन मानतात. म्हणूनच ते केवळ एका महाविद्यालयाचे प्रमुख नाहीत, तर भारतीय उच्च शिक्षणाला दिशा देणारे खऱ्या अर्थाने दिशादर्शक प्रशासक आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला माणूस" जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात.

इंदापूर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात-भाजपा नेते तानाजी मारकड.

श्री बाबिर् विद्यालय रुई येथे २३ वर्षांनी माजी विद्यार्थी व् शिक्षक स्नेह मेळावा