कोरोनाचा सर्वे करणार्या प्रथमिक शिक्षिकेची व्यथा

 कोरोनाचा सर्वे करणार्या प्रथमिक शिक्षिकेची व्यथा ,




 मी प्राथमिक शिक्षिका सुप्रिया गेनबा आगवणे/कणसे.जि.प.शाळा रेडनी, तालुका इंदापूर जिल्हा पुणेे.

इंदापुर प्रतिनिधि-महेश गडदे, 

वेतन आयोगामुळे शिक्षक झाले मालामाल!!!! अशा बातम्या देणाऱ्या सर्व न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांना कोरोना काळात मृत्युमुखी पडलेले हेच शिक्षक का नाही दिसले???

प्रत्येक वेळी देशावर संकट आले कि प्राथमिक शिक्षक उभा राहिला. शिक्षकांच्या परवानगीशिवाय दुष्काळ निधी, पूरग्रस्तांसाठी निधी, कोरोना सहाय्यता निधी पगारा मधून कट करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले गेले. याच काळात आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये महागाई भत्ता शिक्षकांना दिला गेला नाही. याव्यतिरिक्त तालुका ,जिल्हा आणि राज्य स्तरावरील प्राथमिक शिक्षकांच्या अनेक राजकीय संघटनांनी लाखो रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. याच शिक्षकांनी कोविड सेंटर उभारले. ऑक्सीजन सिलेंडर दान केले. पण सरकार पत्रकार परिषदेत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं तर सोडाच पण कोरुना योद्धा म्हणून सर्वे ड्युटी करताना मृत्युमुखी पडलेल्या माझ्या शिक्षक बांधवांच्या कुटुंबीयांना आधार द्यावा, श्रद्धांजली अर्पण करावी हे सुद्धा जमलं नाही.

आज सद्यपरिस्थितीत पुणे जिल्ह्यात शंभरच्यावर प्राथमिक शिक्षक कोरुना बाधित झाले आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यामध्येच काही शिक्षक बांधव डीसीपीएस धारक आहेत.. त्यांना पेन्शन नाही मग त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आधार कोण देणार??? इंदापूर तालुक्यात चार शिक्षक कोरोना योद्धा म्हणून काम करत असताना मयत झाले. शासनाने मंजूर केलेल्या 50 लाखाचा विमा मिळवण्यासाठी कुटुंबीय शासन दरबारी फेऱ्या मारत आहेत. आज वर्ष झाले तरी मात्र शासन विमा अजून कागदावरच आहे.


शासनाच्या व्हाट्सअप वर पाठवलेल्या एका मेसेजवर कोरोना बाधित लोकांच्या प्रत्यक्ष संपर्कात जाऊन काम करणाऱ्या शिक्षकांचे कुटुंबीय आज वाऱ्यावर आहे. ज्या प्राथमिक शिक्षकाने समाजातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षित केले, वेगवेगळ्या पदावर बसवण्यासाठी लायक बनवले त्याच शिक्षकाची अशी दयनीय अवस्था करणे शासनासाठी लाजिरवाने आहे. आज वर्ष झाले ऑनलाइन शिक्षणाबरोबरच कोरूना योद्धा म्हणून शिक्षक बांधव काम करत आहे. कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नसताना covidसेंटर वर नाईट ड्युटी करत आहे. पण गुरुपौर्णिमा साजरी करणाऱ्या या देशात मात्र याच शिक्षकाच्या वीर मरणानंतर विमा मिळवण्यासाठी पायपीट करावी लागते यासारखं दुसरं दुर्दैव कोणतं???


हजारो कोटींची संसद बांधणाऱ्या देशात, शेकडो कोटींचे आमदार निवास बांधणाऱ्या या राज्यात शिक्षकाचे मरण इतका स्वस्त आहे का??? अत्यंत हलक्या दर्जाचे सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज, मास्क देऊन मरणाच्या खाईत ढकलणारे हे  शासन आणखी किती शिक्षक बांधवांचे जीव घेणार आहे, किती भगिनी विधवा किती मुले पोरकी होणार आहेत..???

 देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्र शासनाला एका प्राथमिक शिक्षिकेची एकच विनंती...

   देशावर ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळी माझा शिक्षक बांधव एका सैनिकाचा सारखा उभा राहिला आहे. याच माझ्या बांधवांना वीर मरण प्राप्त झाल्यानंतर शहीद म्हणून घोषित करा, त्यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहू नका. शासकीय इतमामात माझ्या शहीद शिक्षक बांधवाचा अंत्यविधी करा. मानाने आणि सन्मानाने त्यांना घरी जाऊन वीमा रक्कम प्रदान करा.तेव्हाच शिक्षकाने केलेले बलिदान समाजासाठी आदर्श ठरेल..


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.